भूतनाळ तलावात बुडून आईसह पाच मुलांचा मृत्यू; बेपत्ता झाल्यानंतर आढळले सहाही मृतदेह

विजापूर : शहरातील आदर्शनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भूतनाळ तलावात बुडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये आईसह तिच्या पाच मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत महिलेचे नाव शोभा मल्लिकार्जुन जालगिरी (वय ३५) असून, तिच्यासोबत तिची मुले विद्या (१५), सुवर्णा (१३), तिप्पराय (१२), सानिका (१०) आणि विकास (६) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी शोभा जालगिरी आणि तिची पाच मुले बेपत्ता झाल्याची तक्रार विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. शोभा यांचे पती मल्लिकार्जुन जालगिरी यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. कौटुंबिक कारणावरून समज दिल्यानंतर शोभा मुलांना घेऊन घरातून निघून गेल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली.

शोध सुरू असतानाच शोभा आणि त्यांच्या पाचही मुलांचे मृतदेह भूतनाळ तलावात आढळून आले. आदर्शनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तलावातून सहाही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह बीएलडीई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने विजापूर शहरात शोककळा पसरली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, आदर्शनगर पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास सुरू आहे. कौटुंबिक कारण, तलावात बुडण्याची परिस्थिती आणि इतर संभाव्य बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.