मुलुंड पश्चिमेत मेट्रो पिलर कोसळला; रिक्षावर पडून दोन जणांचा मृत्यू

मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी एक दुर्दैवी घटना घडली. लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो बांधकामादरम्यान सिमेंटच्या पिलरचा मोठा भाग अचानक कोसळला. हा ढिगारा थेट खालून जात असलेल्या रिक्षावर पडल्याने रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. Mumbaiतील Mulund पश्चिम भागात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ ही दुर्घटना दुपारी सुमारे १२.२० वाजता घडली. प्राथमिक माहितीनुसार, रिक्षामधील ३ ते ४ प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नेमकी घटना काय?

मेट्रो मार्गिकेचे बांधकाम सुरू असताना पिलरचा काही भाग निखळला आणि तो थेट रस्त्यावर कोसळला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षासह इतर काही वाहनांचेही नुकसान झाले. अचानक झालेल्या या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

बचावकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच Mumbai Fire Brigade, स्थानिक पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

रिक्षामध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून ‘१०८’ रुग्णवाहिकेमार्फत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

वाहतुकीवर मोठा परिणाम

एलबीएस मार्ग हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असल्याने या दुर्घटनेमुळे मुलुंड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे मेट्रो बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाकडून सविस्तर चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.