टी-२० विश्वचषक २०२६ भारताचा ऐतिहासिक विजय; न्यूझीलंडवर ९६ धावांनी मात करत तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली

टी-२० विश्वचषक २०२६ च्या महाअंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या २५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १५९ धावांत गारद झाला. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकत इतिहास रचला. तसेच जेतेपद यशस्वीरीत्या राखणारा जगातील पहिला संघ बनण्याचा मानही भारताने मिळवला. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या पराभवाची आठवण भारतीय चाहत्यांच्या मनात ताजी होती. मात्र यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची झंझावाती भागीदारी केली. अभिषेक शर्माने अवघ्या २१ चेंडूत ५२ धावांचे अर्धशतक झळकावले, तर संजू सॅमसनने ४६ चेंडूत ८९ धावांची तुफानी खेळी साकारली. यानंतर इशान किशन याने २५ चेंडूत ५४ धावा करत धावसंख्येला वेग दिला. अखेरच्या षटकांत शिवम दुबे याने ८ चेंडूत २६ धावा ठोकल्या, तर हार्दिक पांड्या याने १८ धावांचे योगदान दिले. भारताने २० षटकांत ५ बाद २५५ धावा केल्या, जी टी-२० विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली असली तरी पहिला गडी बाद झाल्यानंतर त्यांची फलंदाजी कोसळली. केवळ ७२ धावांतच निम्मा संघ बाद झाला. टिम सायफर्ट याने ५२ धावांची खेळी केली, तर कर्णधार मिचेल सँटनर याने ४३ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत न्यूझीलंडचा डाव १५९ धावांत रोखला आणि भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.