गोरेगावच्या डीबी वूड्स टॉवरमध्ये आग; ९व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये धूर
मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील गोकुलधाम परिसरात
असलेल्या डीबी वूड्स या ४५ मजली भव्य निवासी इमारतीत शुक्रवारी सकाळी आग लागल्याची
घटना घडली. इमारतीच्या ९व्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून धुराचे लोट बाहेर येताना
दिसून आले. अग्निशमन दलाला सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी आग लागल्याची माहिती
मिळाली. त्यानंतर ९ वाजून २५ मिनिटांनी आग लेव्हल-१ म्हणून घोषित करण्यात
आली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण
मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
बेडरूममध्ये लागली आग
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित फ्लॅटच्या बेडरूममध्ये आग लागली
होती. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग
लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले
आगीची माहिती मिळताच इमारतीतील रहिवाशांना तत्काळ बाहेर
काढण्यात आले. नागरिकांना इमारतीतील रेफ्यूजी एरियामध्ये सुरक्षितपणे हलवण्यात
आल्याने मोठी जीवितहानी टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, आगीचे अचूक कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे