अक्कलकोटमध्ये FDAची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ८५० किलो पेढा-मिठाईचा साठा जप्त, चार दुकानांना टाळे

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पेढा उत्पादक आणि मिठाई विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा ८५० किलो पेढा व मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. तसेच चार आस्थापनांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अडीच लाखांचा मिठाई साठा जप्त

FDAच्या पथकाने अक्कलकोट येथील मुख्य मिठाई पुरवठादार रंगोली स्वीट मार्टचे समीर बडेसाहब मकानदार यांच्या आस्थापनेची तपासणी केली. यावेळी अस्वच्छ परिस्थितीत मिठाईची साठवणूक, लेबलविषयक नियमांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा व मानके नियमांतील तरतुदींचे पालन न केल्याचे आढळले. तसेच मिठाईचा दर्जा निर्धारित निकषांनुसार नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या आस्थापनेतून ३९८ किलो कंदी पेढा आणि ४३१ किलो स्वीट हलवा असा एकूण ८२९ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत २ लाख ५० हजार २० रुपये असल्याची माहिती देण्यात आली.

चार आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश

FDAने स्वामी समर्थ मंदिरासमोरील समर्थ स्वीट स्टॉल, पाटील स्वीट शॉप, रंगोली स्वीट मार्ट आणि सलीम मकानदार पेढा स्टॉल या चार आस्थापनांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय रंगोली स्वीट मार्ट या मुख्य पुरवठादाराचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. स्वामी समर्थ मंदिरासमोरील मे. गुरुकृपा पूजा भंडार या आस्थापनेची नोंदणीही निलंबित करण्यात आली आहे. कंदी पेढा आणि स्वीट हलव्याचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

FDAच्या पथकाची कारवाई

ही कारवाई सहआयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक आयुक्त एस. ई. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी एखंडे आणि हिरेमठ यांच्या पथकाने ही तपासणी व कारवाई केली. या कारवाईमुळे अक्कलकोटमधील मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या विश्लेषणानंतर मिठाईच्या दर्जाबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.