सोलापूर महापालिका आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट; पैशांची मागणी करून फसवणुकीचा प्रयत्न
सोलापूर महानगरपालिकाचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या
नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट फेसबुक अकाउंट तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
संबंधित फेक अकाउंटवर आयुक्तांचे नाव व छायाचित्र वापरून सोशल मीडियावरून
नागरिकांशी संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. या बनावट
अकाउंटद्वारे चॅट तसेच फोन कॉलच्या माध्यमातून आयुक्तांचे मित्र, नातेवाईक आणि इतर नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास
आले आहे. या प्रकाराबाबत आयुक्त ओम्बासे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
केले आहे.
गंभीर स्वरूपाचा सायबर गुन्हा
आयुक्तांनी सांगितले की, त्यांच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर
करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रकार केवळ वैयक्तिक
प्रतिष्ठेलाच नाही, तर प्रशासकीय विश्वासार्हतेलाही धक्का
देणारा आहे. सदर कृत्य हे सायबर गुन्ह्याच्या श्रेणीत मोडत असून याबाबत संबंधित
सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी
दिली.
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवरून पैशांची
मागणी झाल्यास त्वरित खात्री करून घ्यावी आणि संशयास्पद व्यवहार टाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारांची माहिती
तातडीने सायबर पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.