‘लवकर या, लवकर जा…’ महिलांसाठी नवी घोषणा; सुनेत्रा पवार यांचा विधान परिषदेत मोठा निर्णय
सुनेत्रा पवार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान
परिषदेत महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली. ‘लवकर या, लवकर जा’ या संकल्पनेवर आधारित ‘लवकर या, लवकर जा…’
प्रणाली लागू करण्यात येणार असून महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या
ठिकाणी लवकर आल्यास लवकर जाण्याची मुभा देण्यात येणार आहे.
विधिमंडळातील हे सुनेत्रा पवार यांचे पहिलेच भाषण होते.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी ही घोषणा केली. मुंबई महानगर
क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली लागू केली जाणार असल्याचे
त्यांनी सांगितले. सकाळच्या वेळेत कार्यालयात जाताना मोठ्या प्रमाणात गर्दी होत
असल्याने महिला कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर
सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेनुसार महिला
कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाची वेळ सकाळी ९.१५ वाजता सुरू होणार असल्याची माहिती
त्यांनी दिली.
महिलांसाठी विविध महत्त्वाच्या घोषणा
विधान परिषदेत बोलताना सुनेत्रा पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजना, प्रसूती रजा, शक्ती कायदा आणि शेतकरी महिलांबाबतही महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक बळ मिळाले असून त्या अधिक सक्षम झाल्याचे त्यांनी सांगितले. भाषणादरम्यान त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच महिलांना १८० दिवसांची प्रसूती रजा देण्याची घोषणाही त्यांनी केली. याशिवाय अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सुमारे १७ हजार अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच ऑनलाइन माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याबाबतही सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.