सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा; १९ पैकी १८ जागांवर विजय

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून, भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने बँकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांपैकी तब्बल १८ जागांवर या पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. दुसरीकडे, अर्जुनसिंह मोहिते पाटील प्रणित स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला केवळ एका जागेवर यश मिळाले. या निकालामुळे सोलापूर जिल्हा बँकेवरील भाजपप्रणित गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष मतमोजणीकडे लागले होते.

१९ पैकी १० जागा बिनविरोध

संचालक मंडळाच्या १९ जागांपैकी सहकार विकास पॅनलने १० जागा यापूर्वीच बिनविरोध जिंकल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ९ जागांसाठी २६ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण २ हजार ५९६ मतदारांपैकी २ हजार २५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८६.९४ इतकी होती. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यात सहकार विकास पॅनलने ९ पैकी ८ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या १० उमेदवारांसह पॅनलच्या एकूण १८ जागा झाल्या.

मोहिते पाटील पॅनलला एकमेव जागा

मतमोजणीतील पहिला निकाल माळशिरस विविध कार्यकारी सोसायटी गटाचा लागला. या गटातून स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचे अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी सहकार विकास पॅनलचे उमेदवार शहाजीराजे देशमुख यांचा पराभव केला. त्यामुळे मोहिते पाटील पॅनलला या निवडणुकीत एकमेव जागा मिळाली. दुसरीकडे, सांगोला विविध कार्यकारी सोसायटी गटातून आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विजय मिळवला. त्यांनी मोहिते पाटील पॅनलचे उमेदवार संजय इंगोले यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार असलेल्या बाबासाहेब देशमुख यांनी सहकार विकास पॅनलकडून निवडणूक लढवली होती.

सहकार विकास पॅनलचे विजयी उमेदवार

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार :

  • राजेंद्र राऊत (बार्शी)
  • प्रशांत परिचारक (पंढरपूर)
  • विक्रांत तथा बाळराजे पाटील (मोहोळ)
  • सिद्धेश्वर आवताडे (मंगळवेढा)
  • यशराज शिंदे (माढा)
  • श्रीदीप हसापुरे (दक्षिण सोलापूर)
  • पृथ्वीराज माने (उत्तर सोलापूर)
  • शंभूराजे जगताप (करमाळा)
  • सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट)
  • अजिंक्यराणा पाटील (ओबीसी गट)

मतदानातून विजयी झालेले उमेदवार :

  • बाबासाहेब देशमुख (सांगोला)
  • अर्चना घाडगे (महिला)
  • शामल बागल (महिला)
  • राजेंद्र बंदीछोडे (इतर मागास/भटक्या जमाती गट)
  • रणजितसिंह शिंदे (कृषी व प्रक्रिया)
  • मनीष देशमुख (बँक व पतसंस्था)
  • सूर्यादित्य साळुंखे (दुग्ध विकास)
  • महादेव कांबळे (अनुसूचित जाती)

शेवटच्या जागेसाठी रंगली चुरस

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एका जागेसाठी भाजपप्रणित सहकार विकास पॅनल आणि मोहिते पाटील गटात चुरस पाहायला मिळाली. या लढतीत सहकार विकास पॅनलचे मनीष देशमुख यांनी विजय मिळवला. त्यामुळे पॅनलने १९ पैकी १८ जागा जिंकत जिल्हा बँकेवरील आपले वर्चस्व सिद्ध केले. दरम्यान, प्रचारादरम्यान कर्जवाटप आणि सहकारी संस्थांच्या आर्थिक स्थितीवरून दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे ही निवडणूक केवळ बँकेच्या सत्तेची लढाई न राहता जिल्ह्यातील राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरली होती. अखेरच्या निकालात सहकार विकास पॅनलने मोठे यश मिळवले, तर मोहिते पाटील गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.