बंगळुरूमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या; कॅब चालक पतीला अटक, कौटुंबिक वादातून हत्याकांडाचा आरोप
बंगळुरूमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या झाल्याची
धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून कॅब चालकाने स्वतःची पत्नी, सासू, मेव्हणे, मेहुणी आणि सात
वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. इंदुशेखर असे आरोपीचे नाव असून,
पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने सात जणांची हत्या केल्याची
कबुली दिल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांकडून त्याच्या
दाव्यांची पडताळणी सुरू आहे.
कौटुंबिक वादातून हत्याकांडाचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी इंदुशेखर आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात माहेरच्या मंडळींशी
असलेल्या सुनीताच्या जवळच्या संबंधांवरून वारंवार वाद होत होते. दोघांचे लग्न होऊन
जवळपास २० वर्षे झाली होती. सुनीता वारंवार माहेरी जात असल्याने पती-पत्नीमध्ये
मतभेद निर्माण झाले होते. कुटुंबातील सदस्यांनी अनेकदा त्यांच्यातील वाद
मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद कायम राहिल्याचे समोर
आले आहे. सुनीताला तिच्या आई आणि भावांचा पाठिंबा मिळत असल्याने आरोपी नाराज होता.
याच रागातून त्याने हत्यांचे नियोजन केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
पत्नीच्या हत्येनंतर सासरच्या मंडळींनाही लक्ष्य केल्याचा
आरोप
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने सर्वप्रथम पत्नी सुनीता हिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह
कपड्यात गुंडाळून नंदी हिल्स परिसरात फेकून दिल्याचा आरोप आहे. सुनीताचा मोबाईल
बंद करून ती बाहेर गेल्याचे त्याने शेजाऱ्यांना सांगितल्याची माहितीही समोर आली
आहे. यानंतर आरोपीने सुनीताचे भाऊ शिवकुमार आणि शंकर यांना पार्टीच्या बहाण्याने
घरी बोलावले. तिथे दोघांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नी
दिव्या आणि नलिनी, तसेच आरोपीची सासू रूपवती आणि सात
वर्षांचा मुलगा पुनीत यांचीही हत्या केल्याचा संशय आहे. दोन दिवसांत सात जणांची
हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मृतांमध्ये पत्नी, सासू आणि दोन मेव्हण्यांचा समावेश
या प्रकरणात मृत्यू झालेल्यांमध्ये आरोपीची पत्नी सुनीता, सासू रूपवती, मेव्हणे शिवकुमार आणि शंकर, मेहुणी दिव्या आणि नलिनी तसेच सात वर्षांचा पुनीत यांचा समावेश असल्याचे
वृत्त आहे. ही घटना बंगळुरूमधील राजाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, बसारूम सर्कलजवळील ५९व्या क्रॉस परिसरातील निवासी भागात घडल्याची माहिती
आहे.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय
हत्यांनंतर आरोपीने घरातील रक्ताचे डाग पुसण्यासाठी
रसायनांचा वापर केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी एक कार जप्त
केली असून, हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेला दगडी
पाटा-वरवंटाही ताब्यात घेतला आहे.
नंदी हिल्स परिसरात सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला
तपासादरम्यान पोलिसांनी नंदी हिल्सच्या पायथ्याशी
शोधमोहीम राबवली. जवळपास चार तासांच्या शोधानंतर सात वर्षांच्या पुनीतचा मृतदेह
सापडला. मात्र, उर्वरित सहा जणांचे मृतदेह अद्याप सापडले
नसल्याचे वृत्त आहे. आरोपीने सात जणांची हत्या केल्याचा दावा केला असला, तरी या दाव्यांची आणि मृत्यूंच्या परिस्थितीची पोलिसांकडून पडताळणी सुरू
आहे.
बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हत्याकांड उघड
गुरुवारी नलिनीच्या आईने श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात
कुटुंबातील सदस्य बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे
पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान हत्याकांडाचा उलगडा झाला आणि इंदुशेखरला
अटक करण्यात आली. या हत्यांमध्ये आरोपीला अन्य कोणाची मदत मिळाली होती का, तसेच आरोपीच्या मुलीची या प्रकरणात काही भूमिका आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. निवासी परिसरात घडलेल्या या घटनेची शेजाऱ्यांना
माहिती कशी मिळाली नाही, याचाही तपास पोलीस करत आहेत.