पंढरपूर-कराड रस्त्यावर भीषण अपघात; टिपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू
पंढरपूर शहरात रविवारी सायंकाळी भीषण अपघातात एका
विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. नवीन कराड नाका परिसरातील पंढरपूर-कराड
रस्त्यावर सायकल पंक्चर काढण्यासाठी निघालेल्या दोन विद्यार्थिनींना भरधाव टिपरने
धडक दिली. या अपघातात श्रेया कांतीलाल गाडे (वय २०, रा. आव्हे, ता.
पंढरपूर) हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिची मैत्रीण स्नेहा विठ्ठल सवयीसर्जे (वय १८,
रा. सलगर, ता. मंगळवेढा) ही गंभीर जखमी झाली
असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रेया गाडे ही र्मवीर भाऊराव
पाटील महाविद्यालय येथे बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. ती नवीन कराड
नाका परिसरातील समाज कल्याण वसतिगृहात राहत होती. रविवारी सायंकाळी सुमारे चार
वाजण्याच्या सुमारास दोघी सायकल पंक्चर काढण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. दरम्यान,
नवीन कराड नाकाहून पंत चौकाकडे जाणाऱ्या (एमएच १३ ईडब्ल्यू ७६७७)
टिपरने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की श्रेयाचा जागीच मृत्यू
झाला. अपघातानंतर चालकाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी घटनास्थळावरून
पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात
असून पोलिसांकडून चालकाचा शोध सुरू आहे.