जिल्हा बँक निवडणुकीत अमोल शिंदेंची दमदार टक्कर; मनीष देशमुख जिंकले, पण शिंदेंच्या कामगिरीची चर्चा

निवडणुकीत विजय आणि पराभव हा राजकारणाचा अविभाज्य भाग असला, तरी काही लढती निकालापलीकडे जाऊन चर्चेचा विषय ठरतात. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून अमोल शिंदे यांनी मनीष देशमुख यांच्याविरोधात दिलेली लढत सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

मनीष देशमुख यांच्या मागे भाजपप्रणीत पॅनलची ताकद

या मतदारसंघात अमोल शिंदे विरुद्ध मनीष देशमुख अशी थेट लढत झाली. मनीष देशमुख यांच्या पाठीशी भाजपप्रणीत पॅनलची ताकद, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि संघटनात्मक यंत्रणा होती. त्यामुळे ही लढत शिंदे यांच्यासाठी आव्हानात्मक मानली जात होती.

पराभव झाला, तरी अमोल शिंदेंच्या कामगिरीची चर्चा

निवडणुकीत मनीष देशमुख यांनी विजय मिळवला. मात्र, अमोल शिंदे यांनी दिलेली कडवी टक्कर चर्चेचा विषय ठरली आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतांच्या फरकाने निकाल लागल्याने शिंदे यांच्या कामगिरीचे समर्थकांकडून कौतुक केले जात आहे. “तुमच्या विजयापेक्षा आमच्या पराभवाचीच चर्चा जास्त आहे,” अशी भावना शिंदे समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे. पहिल्याच मोठ्या सहकार निवडणुकीत अमोल शिंदे यांनी अनुभवी उमेदवाराला कडवी झुंज दिल्याने त्यांची राजकीय ताकद अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे.

आगामी राजकारणात अमोल शिंदेंची भूमिका महत्त्वाची ठरणार?

या निवडणुकीच्या निमित्ताने अमोल शिंदे हे सोलापूरच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रात नवे आव्हान म्हणून पुढे आल्याची चर्चा आहे. पराभव झाला असला, तरी त्यांनी मिळवलेली मते आणि उभारलेली मोर्चेबांधणी आगामी काळात त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाची ठरू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.