सोलापुरात २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; शांतीनगर परिसरात खळबळ

सोलापूर : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नई जिंदगी परिसरातील शांतीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उमर मौलानी बिराजदार (वय २२, रा. शांतीनगर, मिठा नगरजवळ, सोलापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.