सोलापूर दुहेरी आत्महत्या प्रकरणी विजयपूरचा तरुण ताब्यात; चिठ्ठीतून उघड झाला त्रास
सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील
कलावती नगर येथे घडलेल्या पती-पत्नी आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडाली असताना
पोलिसांनी तपासाला वेग देत कर्नाटकातील विजयपूर येथील एका तरुणाला ताब्यात घेतले
आहे. अभिषेक दत्तात्रय कोरे (वय २६, रा. विजयपूर) असे संशयिताचे नाव आहे. सोमनाथ
धानप्पा पाटील (वय ४०) आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय ३५) यांनी विष प्राशन करून
आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी
उघडकीस आली होती. सोलापूर-अक्कलकोट रोडलगतच्या एमआयडीसीतील कलावती नगर परिसरात ही
दुर्दैवी घटना घडली.
काय आहे प्रकरण?
आत्महत्येपूर्वी पाटील दाम्पत्याने लिहिलेल्या चिठ्ठीत
धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विजयपूर येथील एका तरुणाने ओळख वाढवून सातत्याने
त्रास दिल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. या आधारे एमआयडीसी पोलिसांनी अभिषेक
दत्तात्रय कोरे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
त्याला विजयपूर येथून अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
विष प्राशन करून मुलींच्या शेजारीच झोपले
सोमनाथ आणि श्रीदेवी पाटील यांना दोन मुली आहेत. मोठी
मुलगी पाचवीत तर धाकटी तिसरीत शिकत आहे. घटनेच्या रात्री पती-पत्नी घरी परतले
तेव्हा मुली झोपलेल्या होत्या. सकाळी मुली उठल्या असता आई बेशुद्ध अवस्थेत आणि
वडील तोंडाला फेस आलेल्या स्थितीत आढळले. घाबरलेल्या मुलींनी तातडीने आजोबा आणि
काकांना फोन केला. त्यानंतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणामुळे परिसरात हळहळ
व्यक्त होत असून दोन चिमुकल्या मुलींच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.