ठाणे जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर दोन महिन्यांची बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
ठाणे : फटाक्यांमुळे होणाऱ्या आगीच्या दुर्घटना आणि
नागरिकांच्या जीविताला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन ठाणे जिल्हा प्रशासनाने
महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या महसुली हद्दीत रॉकेट आणि
तत्सम हवेत उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर दोन महिन्यांसाठी पूर्ण बंदी घालण्यात
आली आहे. ९ नोव्हेंबर २०२६ ते ८ जानेवारी २०२७ या कालावधीत ही बंदी लागू राहणार
आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन
करणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
आगीच्या घटनांमुळे प्रशासनाचा निर्णय
जिल्ह्यात विविध ठिकाणी रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या
फटाक्यांमुळे आग लागण्याच्या गंभीर घटना घडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
या घटनांमुळे सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान झाले असून, नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. काही नागरिक रॉकेट हातात
धरून किंवा आडव्या दिशेने उडवत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अपघात आणि
आगीचा धोका वाढत असल्याचे प्रशासनाने आदेशात नमूद केले आहे.
बाल्कनी, गच्ची आणि सोसायटी परिसरातही बंदी
रहिवासी भाग, दाट लोकवस्ती, गृहनिर्माण
सोसायट्यांमधील पार्किंग, बाल्कनी, गच्ची
आणि इमारतींच्या परिसरातून रॉकेट उडवण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांमुळे
इमारतींमध्ये किंवा घरांच्या खिडक्यांमध्ये रॉकेट घुसून आग लागण्याची शक्यता असते.
त्यामुळे सार्वजनिक रस्ते, मैदाने, खासगी
जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी,
सोसायटी परिसर तसेच रहिवासी आणि अनिवासी क्षेत्रांमध्ये रॉकेट व
तत्सम हवेत उडणारे फटाके उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.
९ नोव्हेंबरपासून ८ जानेवारीपर्यंत आदेश लागू
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ८ जानेवारी २०२७ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. मात्र, इतर प्रकारच्या फटाक्यांचा वापर करताना प्रचलित कायदे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम आणि सक्षम न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिस
यंत्रणा, महानगरपालिका, नगरपालिका आणि अग्निशमन विभागाला
देण्यात आले आहेत. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांनी आपल्या आवारात आदेशासंदर्भातील
सूचना लावून सर्व सभासदांना माहिती द्यावी, असेही प्रशासनाने
स्पष्ट केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,
२००५ मधील कलम ५१ आणि ६० अन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.