जेजुरीत आषाढी वारीदरम्यान भीषण अपघात; भरधाव टेम्पो दिंडीत घुसला, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आषाढी वारीदरम्यान सोमवारी सकाळी भीषण
अपघात झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान भरधाव टेम्पो
अनियंत्रित होऊन वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच
मृत्यू झाला. या घटनेत 15 ते 16 वारकरी जखमी झाले असून
त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या
माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून
जेजुरीकडे प्रस्थान करत असताना सासवड–जेजुरी मार्गावरील सासवडे परिसरात हा अपघात
घडला. भंडाऱ्याच्या उधळणीदरम्यान दिंडीसोबत असलेला टेम्पो अचानक अनियंत्रित झाला
आणि थेट वारकऱ्यांमध्ये घुसला.
या धडकेत अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत झालेल्या तिन्ही महिला वारकरी सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस आणि प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर वारकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शोक व्यक्त
करत जखमी वारकऱ्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, अशा
सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या
उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, आमदार
रोहित पवार यांनीही या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत अपघाताची सखोल चौकशी
करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.