पत्नी व लेकराच्या विरहाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; ऑडिओ मेसेज व्हायरल
जिल्ह्यातील तळे हिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथे एका
२१ वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली
आहे. पत्नी व लेकराच्या विरहाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती
पोलिसांकडून मिळाली आहे. प्रेम अंकुश जाधव (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. काही
वर्षांपूर्वी त्याने एका तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समजते. दोन महिन्यांपूर्वी पत्नी
प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. त्यानंतर तिने परत येण्यास नकार दिल्याने प्रेम
मानसिक तणावाखाली होता.
आत्महत्येपूर्वी भावनिक ऑडिओ
आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमने पत्नीला दोन ऑडिओ संदेश पाठवले होते. या संदेशांमध्ये त्याने लेकराला चांगले संस्कार देण्याची विनंती करत, “माझ्यात चूक असेल तर माफी मागतो, पण दुसऱ्यांचे ऐकू नकोस,” असे भावनिक शब्द उच्चारले होते. या ऑडिओ संदेशांमुळे नातेवाईक आणि मित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याने गळफास घेतल्याचे समोर आले.
पोलिसांत नोंद
या घटनेची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
शवविच्छेदनानंतर रविवारी सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील
तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.