मध्यरात्री सोलापुरात कोठे-नरोटे आमनेसामने; शाब्दिक वादामुळे राजकीय वातावरण तापले

सोलापूर, दि. ७ : सोलापूरमधील भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. भाजपचे आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यात शुक्रवारी मध्यरात्री जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही पक्षांच्या कार्यालयांबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वादाची पार्श्वभूमी

काही दिवसांपूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना ‘लबाड लांडगा’ अशी उपमा दिली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसमधील वाद अधिक चिघळला. या वादाचे पडसाद गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभर शहरात उमटले. दोन्ही पक्षांकडून आंदोलने आणि प्रतिआंदोलने करण्यात आली. काँग्रेस भवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करून निषेध व्यक्त केला. दरम्यान, फेसबुक लाइव्ह आणि सोशल मीडिया स्टेटसच्या माध्यमातून दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांना आव्हान देण्याचे प्रकार घडले. सोशल मीडियावरील पोस्ट तसेच मारहाणीच्या घटनांप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या असून, संबंधित प्रकरणांत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया पार पडल्याचे वृत्त आहे.

मध्यरात्री कोठे-नरोटे आमनेसामने

वाद वाढत असतानाच शुक्रवारी मध्यरात्री इंद्रधनुष्य अपार्टमेंट आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या राधाश्री निवासासमोर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. याचदरम्यान आमदार कोठे आणि काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे आमनेसामने आले. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रीतम यातनवार यांनी हस्तक्षेप केला. मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलिसांनी मध्यस्थी करून वाद शांत केला. मात्र, या घटनेमुळे भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोलापुरातील राजकीय वाद आता आरोप-प्रत्यारोपांपलीकडे जाऊन वैयक्तिक टीका आणि प्रत्यक्ष संघर्षापर्यंत पोहोचत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.