येडशीत भीषण आग; एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू, दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश
येडशी, दि. ९ : धाराशिव तालुक्यातील येडशी येथे
मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.
करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट वेअर या दुकानाला लागलेली आग शेजारील घरात
पसरल्याने ही हृदयद्रावक दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण येडशी गावावर शोककळा
पसरली आहे.
किराणा दुकानातून घराला आगीचा वेढा
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. काही
वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुकानाला लागून असलेल्या घरालाही आगीने
वेढले. आगीची तीव्रता मोठी असल्याने ग्रामस्थ, अग्निशमन दल
आणि पोलिस प्रशासनाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र,
या दुर्घटनेत घरातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
या आगीत मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :
- उत्तम त्रिंबक करंडे
(वय ७५)
- चंद्रकला उत्तम
करंडे (वय ७०)
- गोविंद उत्तम करंडे
(वय ४७)
- ज्योती गोविंद करंडे
(वय ४२)
- गायत्री गोविंद
करंडे (वय १६)
- सिद्धी गोविंद करंडे
(वय १५)
एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत
झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन अल्पवयीन मुलींसह ज्येष्ठ नागरिकांचा
मृत्यू झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रशासनाकडून घटनेची माहिती घेऊन पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे करंडे
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, येडशी परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.