दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर रोहित पवार; ‘WOW’ संघटनेच्या भगिनींकडून मायेचा फराळ

दिवाळीच्या सणानिमित्त सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना, दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आमदार रोहित पवार थेट शेताच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी त्यांना धीर दिला. स्वतःच्या घरातील दिवाळीचा आनंद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाल्याबद्दल त्यांच्या या दौऱ्याचे कौतुक होत आहे.

‘WOW’ संघटनेच्या भगिनींकडून फराळाची भेट

रोहित पवार यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेची दखल घेत ‘WOW’ (वॉव) संघटनेच्या भगिनींनी विशेष उपक्रम राबवला. त्यांनी स्वतःच्या हाताने दिवाळीचा फराळ तयार करून अक्कलकोट दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांना भेट दिला. यावेळी बहिणींनी त्यांचे औक्षणही केले.

‘बळीराजाची सेवा करणारा आमचा लाडका भाऊ’

‘WOW’ संघटनेच्या संस्थापक विद्या लोलगे यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या. “सत्ता आणि सत्तेचा झगमगाट बाजूला ठेवून संकटात सापडलेल्या बळीराजाची सेवा करणारा हा आमचा खरा लाडका भाऊ आहे. या भावाच्या हातून भविष्यातही गोरगरीब शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांची अशीच अविरत व प्रामाणिक सेवा घडत राहो,” अशी प्रार्थना त्यांनी केली. रोहित पवार यांचा हा दौरा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला. यावेळी विद्या लोलगे, मार्था आसादे, प्रशांत बाबर, मिलिंद गोरे आदी उपस्थित होते.