नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप
सोलापूर, दि. 11 - शाळेत जाणाऱ्या एका नऊ
वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या
नराधमाला जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा विशेष न्यायाधीश जे.
जे. मोहीते यांनी सुनावली. बापू सिद्धप्पा कुसेकर (वय २५, रा.
अक्कलकोट) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिक्षेसोबतच आरोपीला एकूण ७१ हजार
रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही संतापजनक घटना २०१४ मध्ये अक्कलकोट येथे
घडली होती. पीडित मुलगी शाळेत जात असताना आरोपी बापू कुसेकर याने तिला आईच्या
ताब्यातून जबरदस्तीने पळवून नेले. एका निर्जन दगडाच्या खाणीत नेऊन त्याने मुलीला
बेदम मारहाण केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी अक्कलकोट उत्तर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे आणि
काकडे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता कविता बागल यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पीडितेची
साक्ष, तिला पळवून नेताना पाहणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार,
वैद्यकीय अहवाल आणि तांत्रिक पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले.
आरोपीतर्फे अॅड. महेश सोलनकर यांनी बाजू मांडली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,
अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी
अधिकारी फौजदार विजयकुमार जाधव, पोलीस कर्मचारी अजित सुरवसे,
सचिन पुजारी यांनी या खटल्यात विशेष परिश्रम घेतले.