अहिल्यानगर-दौंड महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू
अहिल्यानगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर कोळगाव शिवारातील
माऊली मंदिराजवळ मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. ट्रक आणि इको कार यांची
समोरासमोर जोरदार धडक होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या
माहितीनुसार, पहाटे सुमारे तीन वाजता दौंडकडून नगरकडे
जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिली. या अपघातात चालक
नितीन अनिल कोकाटे (वय २२, रा. काष्टी) यांच्यासह गजानन
जनार्धन पायघन (४७), दुर्पा गजानन पायघन (३६) आणि त्यांचा
मुलगा वैभव गजानन पायघन (१९) यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबातील करण गजानन पायघन
(वय १३) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
पायघन कुटुंब मूळचे अकोले तालुक्यातील पातूर येथील मळतूर
गावचे होते. कामानिमित्त ते श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे वास्तव्यास होते.
पहाटे गावाहून चिंभळेकडे येत असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर परिसरात
मोठी गर्दी झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. पोलिसांकडून
पुढील तपास सुरू आहे.