टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा; “हल्लेखोर भित्रे, अंधारात लपून धमक्या देतात”

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांना सरकार खपवून घेणार नाही. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “अशा कुठल्याही गँगला घाबरण्याचे कारण नाही. हे डरपोक लोकांचे काम आहे,” असे म्हणत फडणवीस यांनी हल्लेखोरांवर टीका केली. मुंबई पोलीस आरोपींना पकडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हल्लेखोरांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून आरोपींची ओळख पटवण्याच्या तपासात महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. या हल्ल्यामागे नेमके कोण आहे, याचाही शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. “पोलिसांना कुणी आव्हान देऊ शकत नाही. हे लोक भित्रे आहेत. ते कुठेतरी लपून बसतात आणि बाहेरून वल्गना करतात,” अशा शब्दांत त्यांनी हल्लेखोरांवर निशाणा साधला.

महाराष्ट्राबाहेरून गुन्हेगारी कारवाया होत असल्याचा दावा

काही गुन्हेगारी कारवाया महाराष्ट्राबाहेरून किंवा देशाबाहेरून चालवल्या जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. अशा प्रकरणांत केंद्रीय तपास यंत्रणांशी समन्वय साधून संबंधितांचे नेटवर्क निष्प्रभ केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. धमक्या देण्यासाठी संवादाच्या विविध माध्यमांचा वापर केला जात असला, तरी प्रत्येक धमकी गांभीर्याने घेतली जाते आणि त्यानुसार कारवाई केली जाते, असेही त्यांनी सांगितले. मुंबई पोलीस व्यावसायिक पद्धतीने तपास करतात आणि आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कलाकारांना घाबरू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कलाकारांनी अशा गुन्हेगारी टोळ्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. संबंधित आरोपींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. टायगर श्रॉफ यांच्यासोबत घटनेच्या वेळी सुरक्षा व्यवस्था नव्हती, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. सुरक्षा मागे ठेवण्यामागील कारणांसह या प्रकरणातील इतर तपशील तपासातून समोर येतील, असे त्यांनी सांगितले. आरोपी अल्पवयीन असल्याचे म्हणता येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. गोळीबारामागील नेमका हेतू, आरोपींची ओळख आणि त्यांचा कोणत्याही गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे का, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.