व्हिएतनाममध्ये पर्यटकांची नाव समुद्रात बुडाली; 32 भारतीयांपैकी 15 जणांचा मृत्यू, शोधमोहीम सुरू
व्हिएतनाममध्ये शनिवारी मोठी सागरी दुर्घटना घडली. फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक पर्यटकांची नाव समुद्रात बुडाल्याने 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या नावेत एकूण 36 जण प्रवास करत होते, त्यापैकी 32 जण भारतीय पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नाव नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर ती समुद्रात बुडाली. दुर्घटनेनंतर प्रवाशांनी मदतीसाठी आर्त हाक दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने शोध व बचाव मोहीम सुरू केली. आतापर्यंत 21 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली आहे. हो ची मिन्ह सिटी आणि हनोई येथे विशेष आपत्कालीन नियंत्रण कक्ष (Emergency Control Room) स्थापन करण्यात आले असून, पीडितांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत व माहिती पुरविण्याचे काम सुरू आहे. भारतीय दूतावासाने सोशल मीडियावरील अधिकृत पोस्टद्वारे या दुर्घटनेला दुजोरा देत स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला असल्याचे सांगितले आहे. तसेच बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू असून अधिकृत माहिती उपलब्ध होताच ती जाहीर केली जाईल, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.