आषाढी यात्रेसाठी 5,500 विशेष एसटी बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% प्रवास सवलत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यातील वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) विशेष नियोजन केले आहे. यंदाच्या यात्रेसाठी राज्यभरातून 5,500 विशेष एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती देताना सांगितले की, यात्रेदरम्यान ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा, महिलांना 50 टक्के भाडे सवलत तसेच शासनाच्या सर्व अधिकृत प्रवासी सवलती पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत.

पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार आणखी बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बसस्थानकांवर विशेष नियंत्रण कक्ष, मदत केंद्रे आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.यात्रेदरम्यान वारकरी आणि भाविकांनी प्रवासाचे नियोजन करून अधिकृत एसटी सेवांचा वापर करावा, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.