जालन्यात पाण्याचा टँकर भरताना विजेचा धक्का; २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जालना: शहरातील मंठा चौफुली परिसरात बुधवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा धक्का लागून एका २० वर्षीय तरुण कामगाराचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जालना तालुक्यातील खरपुडी येथील रहिवासी करण कोरे  (वय २०) हा तरुण पाण्याचा टँकर घेऊन मंठा चौफुली परिसरातील अंकुश कोचिंग क्लासेस येथे आला होता. टँकरमधून कोचिंग क्लासेसच्या टाकीत पाणी भरत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या तीव्र धक्क्यामुळे करण मोरे याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांची कार्यवाही

घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस स्टेशन  जालना  येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक भारती  यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनीही घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून प्राथमिक अंदाजानुसार विजेचा धक्का लागल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वादाच्या भोवऱ्यात कोचिंग क्लासेस

दरम्यान, ज्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे ही घटना घडली ते कोचिंग क्लासेस मागील काही दिवसांपासून अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुण कामगाराच्या मृत्यूनंतर क्लासेसच्या सुरक्षेच्या उपाययोजना आणि व्यवस्थापनाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.