पायल झांबरेंचा मृत्यूपूर्वी भावाला अखेरचा मेसेज; ‘माझी सासू जबाबदार’, मुकुंदनगरमधील घटनेने खळबळ
पुणे : पुण्यातील मुकुंदनगर परिसरात विवाहित तरुणी पायल
झांबरे यांच्या मृत्यू प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. दिवाळी सणासाठी माहेरून १०
तोळे सोने आणण्याच्या मागणीवरून सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा आरोप आहे. या
त्रासाला कंटाळून पायल यांनी सासरच्या कुटुंबाच्या जुन्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन
आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूच्या आदल्या रात्री त्यांनी भावाला
पाठवलेला अखेरचा मेसेजही या प्रकरणात महत्त्वाचा ठरला आहे.
भावाला पाठवला अखेरचा मेसेज
पायल यांचे भाऊ ऋषिकेश पवार यांनी पोलिसांत दिलेल्या
फिर्यादीनुसार, ३० मार्च २०२३ रोजी पायल यांना मुलगी
झाली होती. मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी रुग्णालयात जाऊन वाद घातल्याचा
आरोप आहे. ‘आम्हाला मुलगा हवा होता, मुलगी कशी झाली? आम्ही ही मुलगी सांभाळणार नाही,’ असे बोलून त्यांनी
तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यानंतरही मुलगी झाल्याच्या कारणावरून
पायल यांना वारंवार टोमणे मारणे, शिवीगाळ करणे तसेच शारीरिक
आणि मानसिक त्रास देणे सुरू असल्याचा आरोप आहे.
‘माझी सासू जबाबदार आहे’ असा मेसेज
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पायल यांनी मृत्यूच्या आदल्या रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी भाऊ ऋषिकेश यांना मोबाईलवर मेसेज पाठवला. त्यामध्ये ‘माझी सासू जबाबदार आहे,’ असे त्यांनी लिहिले होते. भावाने तत्काळ पायल यांना फोन केला; मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर भावाने पती अक्षय याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे देत ‘घरच्या भांडणात पडू नका,’ असे सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
गॅलरीतील दरवाजाची काच फोडून प्रवेश
रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींशी
संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे फोन बंद येत होते. पहाटे सासरच्या
मंडळींकडून पायल घरी नसल्याची माहिती मिळाल्यानंतर माहेरचे नातेवाईक मुकुंदनगरमधील
झांबरे पॅलेस येथे पोहोचले. पायल यांच्याबाबत विचारणा केली असता समाधानकारक माहिती
मिळाली नाही. त्यानंतर पती अक्षय याने पायल समोरील फ्लॅटमध्ये असण्याची शक्यता
व्यक्त केली. सर्वजण त्या फ्लॅटवर गेले असता दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे भाऊ
ऋषिकेश यांनी मागील गॅलरीतील दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला आणि मुख्य दरवाजा
उघडला.
किचनमध्ये आढळल्या; रुग्णालयात मृत घोषित
फ्लॅटमधील किचनमध्ये पाहणी केली असता पायल यांनी छताच्या
कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. त्यांना पोलिसांच्या मदतीने
तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित
केले.भावाच्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय अरविंद झांबरे, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात हुंडाबळी तसेच
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास
पोलीस करत आहेत.