होळीच्या रंगावरून आजीकडून नातवावर उकळते पाणी; नागपुरात धक्कादायक घटना

नागपूर : रंग, आनंद आणि उत्साहाचा सण मानली जाणारी होळी–धुळवड यंदा नागपूर जिल्ह्यातील कोराडी परिसरात एका धक्कादायक घटनेमुळे काळवंडली. पिचकारीने रंग उडवल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या आजीने आपल्याच चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी फेकल्याने तो गंभीररीत्या भाजल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम हरीश वांगे (वय ४) असे जखमी बालकाचे नाव असून तो कोराडी येथील आरामशिन परिसरातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये आई-वडिलांसह राहत होता. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ओम घराबाहेर इतर मुलांसोबत पिचकारीने रंग खेळत होता. त्याचवेळी त्याची चुलत आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर गरम केलेले पाणी बादलीत घेऊन अंगणातून जात होत्या. खेळाच्या नादात ओमने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला. या किरकोळ प्रकारामुळे संतापलेल्या आजीने हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट ओमच्या अंगावर फेकली. उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने किंचाळू लागला. त्याच्या कमरेखालच्या भागाला गंभीर भाजल्या गेल्याने घरच्यांनी तातडीने त्याच्यावर थंड पाणी टाकले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. घटनेनंतर बालकाला तातडीने नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार ओम सुमारे ४५ टक्के भाजल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात महिला बादलीतील गरम पाणी मुलावर ओतताना दिसत आहे. पाणी अंगावर पडताच मुलगा वेदनेने ओरडताना आणि उड्या मारताना दिसतो. त्यानंतर घरातील इतर महिलांनी धाव घेऊन त्याच्यावर थंड पाणी टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही फुटेजमध्ये दिसते. विशेष म्हणजे ओम हा त्या महिलेच्या मुलीचा मुलगा असून तो आई-वडिलांसह आजीकडेच राहत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.