‘स्वप्नांना परिस्थितीच्या मर्यादेत बांधू नका’; डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

सोलापूर : “विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नांना भौगोलिक किंवा परिस्थितीजन्य मर्यादांचे बंधन घालू नये. तुमचा जन्म कुठे झाला, यावर तुमचे अंतिम ध्येय ठरत नाही. स्वप्ने मोठी ठेवा आणि ती साकार करण्यासाठी कठोर परिश्रम, चिकाटी व ध्येयाप्रती निष्ठा ठेवा. आयुष्यभर शिकत राहा आणि स्वतःसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही संधी निर्माण करा,” असा प्रेरणादायी संदेश ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. केगाव, सोलापूर येथील एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीच्या पहिल्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

९० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

या पहिल्या दीक्षांत समारंभात बीसीए, एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांतील एकूण ९० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सात गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा हा समारंभ ठरला.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे, कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी, प्र-कुलगुरू डॉ. विद्या निरंजन, बेंगळुरू येथील बायोवेट प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन. एस. श्रीनाथ, जेआयटीच्या सेंटर फॉर इनक्युबेशन, इनोव्हेशन, रिसर्च अँड कन्सल्टन्सी (CIIRC) चे संचालक डॉ. कृष्णा व्यंकटेश, कुलसचिव प्रा. प्राणेश मुरनाळ, परीक्षा नियंत्रक प्रा. प्रभा कासलीवाल, संचालक राघवेंद्र मुकुंदराज चाटे तसेच विविध शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.

सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन

समारंभाच्या सुरुवातीला परीक्षा नियंत्रक प्रा. प्रभा कासलीवाल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. रूपाली धामणे यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव प्रा. प्राणेश मुरनाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.