चारित्र्याच्या संशयातून वाद; यावलमध्ये २० वर्षीय पत्नीची पतीकडून गळा आवळून हत्या

जळगाव : प्रेमविवाहानंतर काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात पतीने आपल्या २० वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात घडली. या प्रकरणी यावल पोलिसांनी आरोपी पतीला काही तासांतच अटक केली आहे.

घरच्यांच्या इच्छेविरुद्ध केला होता प्रेमविवाह

यावल शहरातील गणपती नगर परिसरात राहणारा फरदीन खान आरिफ खान (वय २०) आणि मशिराबी फरदीन खान (वय २०) हे पती-पत्नी होते. मशिराबी हिने कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन फरदीनसोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये वाद होऊ लागले. फरदीनच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय निर्माण झाला होता.

वादातून पतीने आवळला पत्नीचा गळा

मंगळवारी घरात दोघेही एकत्र असताना पुन्हा एकदा पत्नीच्या चारित्र्यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादादरम्यान संतापलेल्या मशिराबीने फरदीनच्या कानशिलात लगावली. यामुळे अधिक संतप्त झालेल्या फरदीनने रागाच्या भरात मशिराबीचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

काही तासांत आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासांतच आरोपी फरदीन खान याला ताब्यात घेतले. मृत मशिराबी हिची आई शमीमाबी सय्यद अक्रम (रा. सुरत, गुजरात) यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर शोकाकुल वातावरणात मशिराबी हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.