भारताने पुन्हा पाकिस्तानचा पराभव! डकवर्थ लुईस नियमानुसार २ धावांनी विजय
हाँगकाँग: सुपर सिक्सेस लीग स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात
पुन्हा एकदा हाय-व्होल्टेज सामना रंगला. आशिया चषक २०२५ मधील वर्चस्वानंतर, भारतीय संघाने या स्पर्धेतही पाकिस्तानचा डकवर्थ लुईस (DLS) नियमानुसार २ धावांनी पराभव करत आपली विजयी लय कायम ठेवली. पाकिस्तानचा
कर्णधार अब्बास आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
भारताकडून रॉबिन उथप्पा आणि भरत चिप्ली यांनी दमदार सलामी देत केवळ १५ चेंडूत ४२
धावांची भागीदारी रचली. रॉबिन उथप्पाने २ चौकार आणि ३ षटकारांसह २८ धावा केल्या,
तर भरत चिप्लीने २४ धावांची खेळी साकारली. कर्णधार दिनेश कार्तिकने
नाबाद १७ धावा करत संघाला मजबूत स्थितीत नेले. भारताने ६ षटकांत ४ गडी गमावून ८६
धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना
जोरदार सुरुवात केली. त्यांनी १ गडी गमावत ४१ धावा केल्या होत्या, इतक्यात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे सामना थांबवावा लागला आणि डकवर्थ
लुईस नियमानुसार भारतीय संघ ३ षटकांच्या खेळानंतर २ धावांनी आघाडीवर ठरला. त्यामुळे
भारताने हा सामना अधिकृतरित्या २ धावांनी जिंकला. या विजयानंतर भारतीय संघाने
पुन्हा एकदा पाकिस्तानवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.