पंतप्रधान मोदींना भेटल्यावर महिला क्रिकेटपटू अरुंधती रेड्डीची मजेशीर गोष्ट; “माझी आई म्हणते, तुम्ही तिचे हिरो आहात!”

भारतीय महिला क्रिकेट संघाने अलीकडेच विश्वचषक विजेतेपद मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाची नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. या वेळी त्यांनी संघाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. तसेच, आगामी स्पर्धांसाठी रणनीती आणि तयारीबद्दलही संवाद साधला. संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी हसतखेळत संवाद साधला. विशेष म्हणजे, टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी यांच्याशी झालेला संवाद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. अरुंधतीने मोदींना सांगितले की, तिची आई त्यांची मोठी चाहती आहे आणि त्यांना “हिरो” मानते. ती म्हणाली, “सर्वप्रथम, मी माझ्या आईचा संदेश द्यायचा आहे. माझ्या आईने सांगितलं की तुम्ही तिचे हिरो आहात. ती मला चार-पाच वेळा फोन करून विचारते — ‘तू माझ्या हिरोला कधी भेटणार आहेस?’” हे ऐकून पंतप्रधान मोदी आणि सर्व खेळाडू हसून लोटपोट झाले. अरुंधती रेड्डीने बीसीसीआयकडून २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात स्थान मिळवले होते. जरी तिला एकदाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही, तरी ती विश्वविजेता संघाचा भाग राहिली.