राहुल गांधींच्या ‘मतदार यादी’ वादातील ब्राझीलियन मॉडेल लरिसाचा खुलासा; "माझा भारताच्या राजकारणाशी काही संबंध नाही"

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील कथित ‘वोट चोरी’ आणि मतदार यादीतील गोंधळावर भाष्य करत ज्या ब्राझीलियन मॉडेलच्या छायाचित्राचा उल्लेख केला होता, त्या मॉडेलने अखेर समोर येत आपली बाजू स्पष्ट केली आहे. लरिसा (Larisa) नावाच्या या मॉडेलने हजारो किलोमीटर दूर ब्राझीलमधून एक व्हिडिओ जारी करत "नमस्ते इंडिया" म्हटले आहे आणि भारतीय राजकारणाशी तिचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता की, एका मॉडेलचा फोटो हरियाणातील मतदार यादीत तब्बल २२ वेळा वापरण्यात आला असून वेगवेगळ्या नावाने मतदान झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या मते, राज्यात २५ लाखांहून अधिक बोगस मतदार तयार करण्यात आले आहेत. या दाव्यानंतर देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या त्या ‘रहस्यमय’ ब्राझीलियन महिलेची ओळख आता स्पष्ट झाली आहे. लरिसा हिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हटले, “नमस्ते इंडिया! मला अनेक भारतीय पत्रकारांनी संपर्क साधला, त्यामुळे मी हे सांगत आहे. माझा भारताच्या राजकारणाशी कोणताही संबंध नाही. मी कधीच भारतात आले नाही. मी तीच रहस्यमयी ब्राझीलियन महिला आहे, जी मतदार यादीतील फोटोमध्ये दिसते. पण ती मी नाही, तो फक्त माझा फोटो आहे.” ती पुढे म्हणाली, “माझ्या छायाचित्राचा वापर ‘स्टॉक इमेज’ म्हणून केला गेला असावा. कोणीतरी ते खरेदी करून गैरवापर केला असावा. मी पूर्वी मॉडेलिंग करत होते, पण आता मी डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणून काम करते. माझे फोटो ऑनलाइन उपलब्ध होते.” लरिसाने हेही नमूद केले की, ती सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवते आणि भारतीय चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल ती आभारी आहे. “मी भारतात प्रसिद्ध झाले आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. पण कृपया समजा — मी त्या मतदार यादीतील महिला नाही,” असे तिने सांगितले. या प्रकारामुळे मतदार यादीतील सुरक्षा आणि ओळख पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राहुल गांधींच्या या विधानानंतर राजकीय वातावरणात नवे वादळ उठले असून, आता लरिसाच्या स्पष्टीकरणामुळे या वादावर नवा ट्विस्ट आला आहे.