पुण्यातील जमीन घोटाळ्यावरून अंबादास दानवे आक्रमक; “मुलगा ३०० कोटींचा व्यवहार करतो, आणि वडिलांना माहिती नाही?”
पुण्यातील मोठ्या जमीन घोटाळा प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित
पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. सुमारे १८०० कोटींच्या
बाजारभावाची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना विकत घेतली गेली आणि त्यासाठी फक्त ५००
रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर
दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. बावधन
पोलिसांनी या संदर्भात दिग्विजय पाटील, शितल तेजवानी आणि रवींद्र तारू या
तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच मुद्रांक विभागाला सात दिवसांत तपास अहवाल
सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणावरून उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी
पार्थ पवार यांच्या सहीचे कागदपत्र सोशल मीडियावर शेअर करत नवा वाद पेटवला आहे.
त्यांनी विचारले की, “पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल
होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का?” दरम्यान,
या प्रकरणावरून उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तीव्र
प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले — “मुलगा
पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही.
आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत... तुमचं तुम्हाला तरी पटतंय
का हे बोलताना? बाजारभावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली
आहे. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या.”
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले
—
“तीन-चार महिन्यांपूर्वी असं काही सुरु
असल्याचं माझ्या कानावर आलं होतं. मी स्पष्ट सांगितलं होतं की चुकीच्या गोष्टी
चालणार नाहीत. आता वेगवेगळ्या जमिनीबद्दल काही सांगितलं जातं, मी सर्व कागदपत्रांची इत्यंभूत माहिती घेणार आहे.” या घोटाळ्यामुळे राजकीय
वातावरणात खळबळ माजली असून, अजित पवारांच्या नैतिक
जबाबदारीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. चौकशीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले
आहे.