मनोज जरांगे पाटील हत्येच्या कटाच्या आरोपावर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर; “सीबीआय चौकशी होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या”
परळी (बीड): मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी
आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला होता.
या गंभीर आरोपांनंतर राज्यात मोठी खळबळ माजली होती. आज धनंजय मुंडे यांनी परळीत
पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंडे म्हणाले, “कट प्रकरणी बोलणारे, अटक झालेले आणि कबुली देणारे
सर्वजण जरांगे यांचेच कार्यकर्ते आहेत. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी,
हे मी स्वतः मागतो. सत्य बाहेर आलेच पाहिजे.” जरांगे यांनी केलेल्या
“अडीच कोटींची सुपारी, भाऊबीजेला भेट, आणि
जुनी गाडी देण्याचे आश्वासन” या आरोपांना मुंडे यांनी ‘हास्यास्पद’ आणि ‘निरर्थक’ म्हटले. तसेच त्यांनी स्वतःची आणि जरांगे यांची
ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली. मुंडे म्हणाले, “एका समाजाला संपविण्याची भाषा अंतरवाली येथून सुरू झाली. दोन समाजात फूट
पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही फूट नाही, एकता साधायची
आहे.” याप्रकरणी वकिलांशी चर्चा करून पुढील कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी
सांगितले. याचवेळी त्यांनी जरांगे यांच्या मेव्हण्यावर वाळू तस्करीचा आरोप करत
“कोणाच्या गाडीत मोबाईल ठेवणे, लोकेशन ट्रॅक करणे हेच काम
आहे का?” असा सवाल केला. दरम्यान, जरांगे
यांच्या तक्रारीनुसार अडीच कोटी रुपयांच्या सुपारीचा कट रचण्यात आला होता. गेवराई
तालुक्यातील अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना जालना पोलिसांनी
ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी हा जरांगे यांचा जुना सहकारी असल्याची माहिती
समोर आली आहे. जरांगे यांनी आरोप केला होता की, धनंजय मुंडे
यांचे पीए कांचन यांनी आरोपींना भेट घडवून आणली आणि भाऊबीजेला झाल्टा फाट्यावर कट
रचण्यात आला. “मुंडे यांनी जुनी गाडी देण्याचे आश्वासन दिले,” असा दावा जरांगे यांनी केला होता. या आरोपांनंतर आता राज्यातील राजकारण
आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.