मित्रासाठी दिली प्राणांची आहुती; एकुलत्या एक मुलाचा करुण अंत

मैत्रीसाठी काय पण’ हे वाक्य प्रत्यक्षात उतरवणारी हृदयद्रावक घटना Shivamogga जिल्ह्यातील सुलेबैलू परिसरात घडली आहे. कोचिंग क्लासवरून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात संकेत नावाच्या विद्यार्थ्याने आपल्या जिवलग मित्राला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त जमावाने त्याच्यावरच जीवघेणा हल्ला केला. सोमवारी संध्याकाळी सुलेबैलू येथील सरकारी हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष जादा तास आयोजित करण्यात आले होते. वर्ग संपल्यानंतर विद्यार्थी बाहेर पडत असताना काही तरुणांनी अचानक गोंधळ घालत हल्ला चढवला. हल्लेखोरांनी सर्वप्रथम गिरीश नावाच्या विद्यार्थ्याला लक्ष्य करून बेदम मारहाण सुरू केली. गिरीशला वाचवण्यासाठी संकेत निडरपणे पुढे आला. मात्र, जमावाने गिरीशला सोडून संकेतवर हल्ला चढवला. त्याच्या छातीवर, पोटावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेला संकेत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. जखमी गिरीशने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर स्थानिकांनी संकेतला तातडीने रुग्णालयात हलवले; मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तुंगा नगर पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक आमदार Channabasappa यांनी रुग्णालयात भेट देत जखमी विद्यार्थ्याची विचारपूस केली व मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या घटनेवर त्यांनी राज्य सरकारवर टीका करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.