तुकाराम नगरमध्ये भटक्या कुत्र्याला हवेत फिरवून आपटलं; आरोपीवर गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर
आली आहे. तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री एका
भटक्या कुत्र्याला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत
कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली
आहे. माहितीनुसार, रात्री सुमारे एकच्या सुमारास आरोपी
स्वप्निल सखाराम सावंत याने रस्त्यावर उभ्या असलेल्या कुत्र्याला पाठीमागून पकडले.
प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार, त्याने त्या
कुत्र्याला हवेत गोल फिरवत जोरात जमिनीवर आपटले. या मारहाणीत कुत्रा गंभीर जखमी
झाला. यावरही समाधान न मानता आरोपी आणि त्याच्या सोबत असलेल्या सहा ते सात जणांनी
भर रस्त्यात आरडाओरडा करत धिंगाणा घातला. त्यानंतर आरोपींकडील चारचाकी वाहनाने
जखमी कुत्र्याला उडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने कुत्रा
थोडक्यात बचावल्याचे सांगितले जात आहे. ही घटना उघड होताच एका तरुणाने पुढाकार घेत
पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन येथे स्वप्निल सखाराम सावंत याच्याविरोधात
गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित कलमांनुसार कारवाई सुरू केली असून
सीसीटीव्हीच्या आधारे इतर सहभागींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. निष्पाप
प्राण्यांवर होणाऱ्या अशा क्रूर घटनांबाबत प्राणीप्रेमी आणि नागरिकांकडून तीव्र
संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा,
अशी मागणी जोर धरत आहे.