रत्नागिरीत महालक्ष्मी मिनी मॉलला भीषण आग; १५ अग्निशमन बंब घटनास्थळी, लगतची दुकानेही धोक्यात
रत्नागिरीत पहाटेपासून अग्नितांडव
रत्नागिरी शहरातील महालक्ष्मी मिनी मॉलला भाऊबीजेच्या दिवशी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटे सुमारे ५ वाजता सुरू झालेली आग सकाळी ८ वाजेपर्यंतही धुमसत होती. या आगीमुळे मॉलमधील कार्यालयासह परिसरातील व्यावसायिक आस्थापनांना धोका निर्माण झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी १० ते १५ अग्निशमन बंब तैनात करण्यात आले. मात्र, सुरुवातीच्या वृत्तानुसार सकाळी आठ वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले नव्हते.
लगतची दुकाने आणि कार्यालयांनाही आगीचा धोका
महालक्ष्मी मिनी मॉलमधील आग भडकत गेल्याने परिसरातील लगतच्या दुकानांनाही आगीने वेढा घातला. दैनिक सागरच्या कार्यालयापर्यंत आग पोहोचल्याचे वृत्त आहे. तसेच महिला पतसंस्थेचे कार्यालयही धोक्यात आले होते. परिसरात धुराचे मोठे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहाटेच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने मॉलमध्ये कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे प्राथमिक माहितीनुसार या घटनेत जीवितहानी टळली आहे.
शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज; कारण अस्पष्ट
मॉलमध्ये प्लास्टिक, कापड आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आग अधिक
भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले होते. स्थानिक नागरिकही मदतीसाठी पुढे आले. आगीचा परिसरातील इतर दुकानांना फटका बसू नये, यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नुकसानीचा नेमका आकडा आणि आगीचे कारण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.