चंद्रपूरमध्ये भावाकडून बहिणीची निर्घृण हत्या; संपत्तीच्या वादातून कोयत्याने वार

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात सख्या भावानेच आपल्या बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आईदेखील गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. झाडे प्लॉट परिसरात ही घटना घडली. सुरज शंकर भोंडे (वय २८) असे आरोपीचे नाव असून संजीवनी शंकर भोंडे (वय ३२) असे मृत बहिणीचे नाव आहे. तर पुष्पा शंकर भोंडे (वय ५८) या आई गंभीर जखमी झाल्या आहेत. संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरात वाद सुरू होता. आई व बहीण स्वतंत्र राहत होत्या, तर भाऊ आणि वडील वेगळे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या तीव्र वादानंतर आरोपीने कोयत्याने बहिणीवर वार करून तिची हत्या केली. आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावरही हल्ला करण्यात आला. भद्रावती पोलिसांनी आरोपीला अटक केली असून वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अशाच प्रकारची आणखी एक घटना नालासोपारा येथे घडली आहे. नालासोपारा पूर्वेकडील टाकीरोड परिसरातील सर्वोदय वसाहतीत मनोरुग्ण भावाने बहिणीची हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेत मध्यस्थी करणारी आई गंभीर जखमी झाली आहे. Vasai-Virar शहर परिसरात एकाच आठवड्यात घडलेली ही चौथी हत्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.