दिवाळी पाडव्याला सोलापूरकरांसाठी १८ वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवा सुरू; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते शुभारंभ
सोलापूरकरांच्या सेवेत आधुनिक इलेक्ट्रिक बस
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूरकरांसाठी आधुनिक, आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवेचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिल्या टप्प्यात २० बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १८ बसेस प्रत्यक्ष सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, दोन बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
महापुरुषांना अभिवादन करून बससेवेचा प्रारंभ
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापौर विनायक कोंड्याल यांनी भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर
सोलापूर महानगरपालिका मुख्यालय परिसरातील कै. अप्पासाहेब वाराद यांच्या पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करण्यात आला. इलेक्ट्रिक बसेसचे विधिवत पूजन करून हिरवा झेंडा
दाखविण्यात आला.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी
समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका
रोहिणी तडवळकर, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, महिला व बालकल्याण समिती
सभापती निर्मला जंगम, मंडई व उद्यान समिती सभापती राजशेखर
पाटील, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे यांच्यासह विविध नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
महापौरांनी तिकीट काढून घेतला बसप्रवासाचा अनुभव
बससेवेचा शुभारंभ झाल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी तिकीट
काढून इलेक्ट्रिक बसमधून प्रवास केला. त्यांच्यासोबत उपमहापौर, सभागृह
नेते, विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांनीही बसमधून
प्रवास करून सुविधांची पाहणी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती
संभाजी महाराज चौक या मार्गाने प्रवास करून हा ताफा पुन्हा महानगरपालिका
मुख्यालयात दाखल झाला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी बसमधील वातानुकूलित सुविधा, प्रवाशांसाठी उपलब्ध सोयी आणि प्रवासाचा अनुभव घेतला.
शहरातील ९, तर ग्रामीण भागातील ७ मार्गांवर सेवा
सोलापूर महानगरपालिकेला प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा योजनेअंतर्गत एकूण १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या २० बसेसपैकी १८ बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या असून दोन बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व बसेस वातानुकूलित असून, किमान तिकीट दर १० रुपये ठेवण्यात आला आहे. प्रवासाच्या अंतरानुसार पुढील तिकीट दर निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही परवडणाऱ्या दरात वातानुकूलित बसमधून प्रवास करता येणार आहे. सोलापूर शहरातील ९ आणि ग्रामीण भागातील ७ अशा एकूण १६ मार्गांवर या बसेस धावणार आहेत. बससेवेचे दोन सत्रांत नियोजन करण्यात आले आहे.
- पहिले सत्र : सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत
- दुसरे सत्र : दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत
प्रदूषण कमी करण्यास मदत होणार : महापौर
महापौर विनायक कोंड्याल म्हणाले की, प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून, पहिल्या टप्प्यातील १८ बसेस दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक, वातानुकूलित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. किमान १० रुपये तिकीट दरामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करून महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बससेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि प्रदूषण नियंत्रणास मदत होईल. शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी सांगितले. या इलेक्ट्रिक बससेवेमुळे सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांना आधुनिक, वातानुकूलित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.