कांदा एक्सप्रेसमध्ये नेमकं दडलंय काय? शेतकऱ्यांनी गोण्या उघडण्याची मागणी करत ट्रेन रोखली

नाशिक : लासलगाव येथून दिल्लीच्या दिशेने रवाना झालेली कांदा एक्सप्रेस सध्या वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. दिल्लीला पाठवण्यात येणारा कांदा सडका, खराब आणि अपेक्षेपेक्षा कमी आकाराचा असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. कांद्याचा प्रत्यक्ष दर्जा तपासण्यासाठी गोण्या उघडण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांनी दोन वेळा रोखली ट्रेन

चांदवड तालुक्यातील शेतकरी गणेश निंबाळकर यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी कांदा एक्सप्रेस दोन वेळा रोखण्याचा प्रयत्न केला. रेल्वेतील कांद्याच्या गोण्या उघडून प्रत्यक्ष मालाची गुणवत्ता तपासावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, दुसऱ्यांदा ट्रेन रोखण्याचा प्रयत्न होताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केले. त्यानंतर कांदा एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात आली.

कांद्याच्या गुणवत्तेवर शेतकऱ्यांचा सवाल

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कांद्याच्या बोगीत गोण्या भरताना त्यामध्ये खराब, सडका आणि अपेक्षेपेक्षा लहान आकाराचा कांदा असल्याचे दिसून आले. त्यामुळे दिल्लीतील ग्राहकांसाठी नेमका कोणत्या दर्जाचा कांदा पाठवला जात आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदी करताना गुणवत्ता, आकार, रंग आणि कांद्याची स्थिती याबाबत ठरावीक निकष असल्याचे सांगितले जाते. साधारणपणे ४५ ते ६५ मिलिमीटर आकाराच्या कांद्याला प्राधान्य दिले जाते, असा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. मात्र, लासलगावमधून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या कांद्याची गुणवत्ता आणि खरेदीचे निकष यामध्ये तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, शेतकऱ्यांचे आरोप सीडब्ल्यूसीच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत. सीडब्ल्यूसीचे अधिकारी अजय जादू यांनी दिल्लीला पाठवला जाणारा कांदा योग्य दर्जाचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आरोप आणि अधिकाऱ्यांचा दावा यामुळे कांद्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२१ बोगींच्या ट्रेनमध्ये साडेचारशे टन कांदा

कांदा एक्सप्रेसमध्ये तब्बल २१ बोगी आहेत. मात्र, या विशेष रेल्वेतून केवळ सुमारे ४५० मेट्रिक टन कांदा दिल्लीला पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. रेल्वेची मोठी क्षमता उपलब्ध असतानाही अनेक बोगींमध्ये अपेक्षित प्रमाणात माल भरला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उपलब्ध क्षमतेच्या तुलनेत जवळपास ६० ते ६५ टक्के जागा रिकामी राहिल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

खरेदी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह

एकीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार आहे. तर दुसरीकडे सरकारी यंत्रणेमार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठेत पाठवला जात आहे. त्यातच कांद्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाल्याने संपूर्ण खरेदी आणि साठवणूक प्रक्रियेवरही संशय व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांनी नाफेड, एनसीसीएफ आणि सीडब्ल्यूसीच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावत पाठवण्यात येणारा कांदा निर्धारित निकषांनुसार असल्याचा दावा केला आहे.

निष्पक्ष चौकशीची मागणी

दिल्लीला पाठवण्यात आलेल्या कांद्याचा प्रत्यक्ष दर्जा काय आहे? जर कांदा गुणवत्ता निकषांमध्ये बसत नसेल, तर त्याची खरेदी कोणत्या निकषांवर झाली? त्याची साठवणूक कशी करण्यात आली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कांदा खरेदी आणि वितरण व्यवस्थेतील वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे कांद्याच्या गुणवत्तेवरून सुरू झालेला हा वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.