सोशल मीडियावर दहशत माजवणं चालणार नाही; पोलिसांनी खाक्या दाखवला, तथाकथित भाईला दणका
बारामती : सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी
हत्यारांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करणारे व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणांना आता
पोलिसांचा इशारा मिळाला आहे. बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील एका तरुणाने
पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन धमकीवजा मजकूर असलेली रील सोशल मीडियावर प्रसारित
केली. या प्रकरणी सुपा पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला
अटक केली आहे.
रीलमध्ये नेमकं काय होतं?
पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट
रोजी ‘prem_jagtap_0295’
या इन्स्टाग्राम अकाउंटवरील व्हिडीओ आला. बाबुर्डी येथील प्रेम
प्रताप जगताप याने हातात पिस्तूल सदृश्य वस्तू घेऊन हा व्हिडीओ पोस्ट केल्याचे
पोलिसांच्या निदर्शनास आले. व्हिडीओमध्ये ‘आलीशान युवा
प्रतिष्ठान’ असा मजकूर तसेच ‘जंगल
अपना है, और कानून भी अपना है’ अशा
स्वरूपाचा धमकीवजा मजकूर वापरण्यात आला होता.
पोलिसांनी केली कारवाई
या प्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली.
प्रेम जगताप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, भारतीय शस्त्र कायदा तसेच महाराष्ट्र
पोलीस कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी
संबंधित तरुणाला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश
साळुंके करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम
यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस
निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली.
‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’
सोशल मीडियावर हत्यारांचे प्रदर्शन करून आभासी भाईगिरी
दाखवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. ‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’, असा स्पष्ट इशारा सुपा पोलिसांनी दिला आहे. सोशल मीडिया मनोरंजन, माहिती आणि शिक्षणासाठी प्रभावी माध्यम असले तरी त्याचा गैरवापर केल्यास
कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, हे या कारवाईतून
पोलिसांनी स्पष्ट केले आहे.