कंबर तलावात तरुणाचा मृतदेह आढळला; पैशांच्या वादातून धमकीचा संशय, पोलिसांचा तपास सुरू
सोलापूर : शहरातील गवळी वस्ती परिसरातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह
कंबर तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नातेवाईकांनी संशय व्यक्त
केला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटेश पांडुरंग बलमेरी हा ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता.
त्यानंतर नातेवाईक आणि मित्रांनी रेल्वे स्थानक, एसटी स्टँड
तसेच विविध ठिकाणी त्याचा शोध घेतला. शोधमोहीमेदरम्यान विजापूर रोडवरील कंबर
तलावाजवळील रेल्वे रुळांजवळ त्याची दुचाकी आणि मोबाईल फोन सापडला. दुपारी सुमारे
दीड वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी व्यंकटेशला रेल्वे रुळांजवळ पाहिल्याची
माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता
असल्याची नोंद करण्यात आली.
दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजता
कंबर तलावात पाण्यावर तरंगत असलेला व्यंकटेशचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह
शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार
रुग्णालयात पाठविण्यात आला.
व्यंकटेश हा एमआयडीसी परिसरातील एका टॉवेल कारखान्यात
जॉगर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार असून तो
कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी व्यंकटेशने आई आणि काही मित्रांशी दूरध्वनीवर संवाद साधला
होता. मित्रांशी बोलताना तो जोरात रडत होता आणि त्यानंतर अचानक फोन कट केल्याचे
समोर आले आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी संशय व्यक्त करत, व्यंकटेशने
एका मित्राकडून काही पैसे घेतले होते आणि त्या पैशांच्या कारणावरून त्याला
धमकावण्यात आले असावे, असा आरोप केला आहे.
दरम्यान, या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी
झालेली नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण
शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतर स्पष्ट होणार आहे.