स्वस्तात सोन्याच्या आमिषाला बळी; सोलापूरच्या तरुणाची बीडमध्ये ५ लाखांची फसवणूक
बीड : स्वस्तात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवत सोशल मीडियाच्या
माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाची तब्बल ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची
घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पंढरपूर
तालुक्यातील मगरवाडी येथील आबासाहेब सुरेश क्षीरसागर (वय ३५) यांच्याशी एका
भामट्याने सोशल मीडियावरून संपर्क साधला. त्याने अवघ्या ५ लाख रुपयांत २५ तोळे
सोने देण्याचे आमिष दाखवले. स्वस्त दरात सोने मिळत असल्याच्या आशेने क्षीरसागर
हे आरोपीच्या जाळ्यात अडकले. २ ऑगस्ट रोजी आरोपीने त्यांना आष्टी तालुक्यातील
अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुंटेफळ येथील शेतात बोलावले. तेथे
त्याने २५ तोळे वजनाची १५० बनावट सोन्याची नाणी देत ५ लाख रुपये रोख घेतले
आणि घटनास्थळावरून पसार झाला.
करमाळा येथे परतल्यानंतर नाण्यांची तपासणी केली असता ती बनावट
असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आबासाहेब क्षीरसागर यांनी ३
ऑगस्ट रोजी अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून 'गजू डिजे' (पत्ता अज्ञात) या संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरून स्वस्तात सोने किंवा इतर मौल्यवान वस्तू देण्याचे आमिष दाखवणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, तसेच अशा प्रकारची संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.