मुंबई पोलिस दलात साडेसहा कोटींचा वेतन घोटाळा; पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

मुंबई : मुंबई पोलिस दलातील वेतन वितरण प्रक्रियेत मोठा कथित आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला असून शासनाची सुमारे साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयातील एका पोलीस निरीक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस कर्मचाऱ्यांचा डेटा जुन्या 'सेवार्थ' वेतन प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये स्थलांतरित करताना गंभीर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. पोलिस दलात कार्यरत नसलेल्या आठ ते दहा व्यक्तींना पोलिस कर्मचारी असल्याचे दाखवून त्यांच्या बँक खात्यांमध्ये वेतन जमा करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा संशय आल्यानंतर करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात (ऑडिट) २०१९ आणि २०२० या कालावधीतील काही महिन्यांच्या वेतन व्यवहारांमध्ये मोठी तफावत आढळून आली. त्यानंतर शासनाची फसवणूक, पुरावे नष्ट करणे आणि कट रचणे यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील आणि पांडुरंग कदम या नावांवर वेतन काढण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, संबंधित व्यक्ती मुंबई पोलिस दलात कार्यरत नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण, प्रमुख लिपिक अजय राठोड आणि वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांच्यासह इतरांवर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित बँक खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम नेमकी कुणाच्या ताब्यात गेली, तसेच धुळे आणि लातूर येथे यापूर्वी समोर आलेल्या वेतन घोटाळ्यांशी या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचाही तपास मुंबई पोलीस करत आहेत.