पोलीस भरतीच्या सरावादरम्यान २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; धावताना हृदयविकाराचा झटका

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथे पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी धावण्याचा सराव करत असताना २८ वर्षीय तरुणाचा संशयित हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. मृत तरुणाचे नाव सुहास संभाजी पाटील (वय २८) असे असून तो महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत होता. सध्या तो सुट्टीवर गावी आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी नगाव परिसरात पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करत असताना सुहास यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच ते धावताना खाली कोसळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, नगाव परिसरात सरावादरम्यान तरुणाचा मृत्यू होण्याची गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ४ मार्च रोजी १९ वर्षीय तरुणाचाही धावण्याच्या सरावादरम्यान अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा घटनांबाबत नागरिकांमध्ये आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हृदयरोग तज्ज्ञांनी अतितीव्र व्यायाम किंवा अचानक जास्त वेगाने धावल्याने हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो, असा इशारा दिला आहे. शारीरिक सराव करणाऱ्या उमेदवारांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून आपल्या क्षमतेनुसारच व्यायाम करावा आणि कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास तात्काळ सराव थांबवून वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.