रामधरणेश्वर तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

रायगड : अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर येथील तलावात फिरण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून निहार विजय शेट्टी (वय २६, रा. मेटपाडा, अलिबाग) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निहार शेट्टी हा त्याचे मित्र-मैत्रिणी आकांक्षा उतेकर, राधिका पाटील आणि हेमंत जगे यांच्यासोबत रामधरणेश्वर येथे फिरण्यासाठी गेला होता. सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास तो तलावाच्या पाण्यात उतरला. यावेळी त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला.

सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. घटनेनंतर करण इंदुलकर यांनी निहारचा भाऊ साहिल शेट्टी याला फोन करून माहिती दिली. ही बातमी मिळताच साहिल आणि कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत निहारचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. निहार शांत, मनमिळावू आणि मदतीसाठी तत्पर स्वभावाचा असल्याने त्याच्या निधनाने मित्रपरिवार आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पावसाळ्यात तलाव, नदी आणि धबधब्यांमध्ये पाण्यात उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.