तिवरे पुलावरून नदीत पडून सोलापूरच्या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात तिवरे फणसवाडी येथे पुलावर उभे असताना तोल जाऊन नदीपात्रात पडल्याने सोलापूरच्या २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी घडली असून याप्रकरणी अलोरे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणाचे नाव राजवर्धन किरण संगा (वय २०, रा. कन्ना चौक, सोलापूर, सध्या रा. खेर्डी, चिपळूण) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजवर्धन हा ३१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६:३५ वाजता मित्र मोहम्मद नासीर अब्दुल रहीम खान याच्यासोबत तिवरे फणसवाडी येथील पुलावर उभा होता. यावेळी तो वाहनांच्या काचा स्वच्छ करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो नदीपात्रात कोसळला. नदीतील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर गंगेचीवाडी, तिवरे परिसरात नदीकाठावरील झाडांमध्ये अडकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. राजवर्धनला तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची अलोरे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.