चार हुतात्मा चौकात संजय राऊतांना शिवसेना उद्धव गटाचा पाठिंबा; दुग्धाभिषेक, आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
सोलापूर : खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील
राजकीय वातावरण तापले असून त्याचे पडसाद सोलापुरातही उमटले. चार हुतात्मा चौकात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या
प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यापूर्वी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने याच चौकात संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेना उद्धव गटाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन आयोजित केले. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान संजय राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली तसेच त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून ऐक्य व्यक्त करण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चार हुतात्मा चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून राज्यभरात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, एका बाजूला भाजपाकडून माफीची मागणी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्यांच्या समर्थनाची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे हा राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.