ललिता अंबिका देवी मंदिरात 'आपला दरबार' संपन्न; नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे आश्वासन

सोलापूर : विडी घरकुल परिसरातील प्रभाग क्रमांक १० आणि ११ मधील ललिता अंबिका देवी मंदिरात आयोजित 'आपला दरबार' उपक्रमाचा पाचवा दरबार उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरबारात नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, वीज आणि इतर मूलभूत नागरी सुविधांबाबतच्या अडचणी मांडल्या. यावर संबंधित समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी दिले. यावेळी प्रथमेश कोठे यांनी मागील दरबारात मांडण्यात आलेल्या प्रलंबित समस्यांवरही योग्य ती कार्यवाही करण्यात आल्याची माहिती दिली. 'आपला दरबार' या उपक्रमामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना गतीने मार्ग मिळत असून नागरिकांचा विश्वासही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला नगरसेवक प्रथमेश कोठे, अजय पोन्नम, सतीश सीरसील्ला यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.