तुकाराम मुंढेंची बनावट पनीरवर मोठी कारवाई; महाराष्ट्रात नॉन-डेअरी पनीरवर बंदी

मुंबई : राज्यातील भेसळयुक्त आणि बनावट दुग्धजन्य पदार्थांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर नॉन-डेअरी (अॅनालॉग) पनीरच्या उत्पादन, पॅकिंग, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

या निर्णयाचा मुख्य उद्देश ग्राहकांची फसवणूक रोखणे आणि राज्यातील अन्नसुरक्षा अधिक मजबूत करणे हा आहे. आदेशानुसार आता महाराष्ट्रात कोणत्याही स्तरावर अॅनालॉग पनीरचे उत्पादन किंवा विक्री करता येणार नाही. अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ अंतर्गत या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच असुरक्षित अन्नामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधितांवर जन्मठेपेची शिक्षा आणि किमान १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद कायद्यात आहे.

अॅनालॉग पनीर म्हणजे काय?
अॅनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीर हे दुधापासून तयार केलेले नसते. ते वनस्पती तेल, व्हेजिटेबल फॅट आणि इतर नॉन-डेअरी घटकांचा वापर करून तयार केले जाते. दिसायला हे पारंपरिक पनीरसारखे असले तरी त्याची गुणवत्ता, पोषणमूल्य आणि रचना वेगळी असते. अशा उत्पादनाची योग्य माहिती न देता ते डेअरी पनीर म्हणून विकणे ही ग्राहकांची दिशाभूल मानली जाते.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बनावट दूध आणि पनीरविरोधात विशेष तपास मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर आणि त्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल जप्त करण्यात आला होता.अन्न सुरक्षा विभागाने नागरिकांना विश्वासार्ह ब्रँड किंवा परवानाधारक विक्रेत्यांकडूनच पनीर खरेदी करण्याचे, तसेच उत्पादनावरील लेबल, घटकांची माहिती आणि FSSAI परवाना तपासण्याचे आवाहन केले आहे.